कोल्हापूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (CM Uddhav Thackery at inauguration of SARTHI centre in Kolhapur Maharashtra)
ते शनिवारी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानले. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. करवीर नगरीत शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सारथीच्या उपकेंद्राचं उद्घानट होतंय, याविषयी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे.मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो!’
(CM Uddhav Thackery at inauguration of SARTHI centre in Kolhapur Maharashtra)