सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अनेकांनी बंडाचे हत्यार उपसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मातबर नेत्याची चांगलीच अडचण होणार आहे. सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधातही स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी बंड पुकारले आहे. शहर मध्य मतदार संघ हा मुस्लीम बहुल असल्याने मुस्लीम समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या दुसऱ्यांदा पराभव झाला. त्याचे दुष्परिणाम दिसायला आता सुरुवात झाली आहे. कालपर्यंत शिंदे यांचा शब्द पाळणारे कार्यकर्ते आता त्यांच्यावर भलतेच नाराज झाले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या अडचणी काहीशा वाढल्या असून त्यांच्या विरोधात राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळचे असणारे अनेक जण बंडाच्या पावित्रेत आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मतदार संघावर मुस्लीम समाजाने दावा केला आहे. हे दावा करणारे दुसरे तिसरे कुणी नसून काँग्रेसचे माजी महापौर आणि सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक यु.एन.बेरिया हे आहेत.
शहर मध्य मतदार संघात मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार संख्या आहे. मात्र असं असताना प्रत्येक वेळेस मुस्लीम समाजाला डावललं जात आहे. त्यामुळे यंदाच्या वेळेस आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतःहून मतदार संघ सोडावा आणि मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीकडे करण्यात आली आहे.
पक्षात अनेक निष्टावंत असताना आणि सक्षम उमेदवार असताना सुद्धा 2009 मध्ये अनेकांना डावलून नवख्या असलेल्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली गेली. तरीही मुस्लीम समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. 2009 आणि 2014 च्या दोन्ही निवडणुकीत प्रणिती शिंदेंना निवडून आणण्यात मुस्लीम समाजाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे यंदा उमेदवार मुस्लीम समाजाचाच असायला हवं असा आग्रह मुस्लीम नेत्यांनी धरला आहे. इतकच काय प्रणिती शिंदेना दुसऱ्या मतदार संघाचा विचार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
एकीकडे मुस्लीम समाजाने आमदार प्रणिती शिंदेच्या शहर मध्यवर दावा केलेला असतानाच मतदार संघातील क्रमांक दोनवर असणाऱ्या आणि कॉंग्रेसची मोठी वोट बँक असणाऱ्या मोची समाजाने सुद्धा उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह केला आहे.त्यासाठी मोची समाजाचे बैठकावर बैठकाचे सत्र सुरूच आहे ,
सोलापूर शहरातील विधानसभेच्या 3 जागापैकी शहर उत्तर हा जणू भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे त्या मतदार संघातून निवडणूक लढायला धजावत नाहीय. तर तिकडे दक्षिण मतदार संघात सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी चांगलंच बस्तान बांधलय. उरलेल्या शहर मध्यच्या जागेवर आता या कॉंग्रेसजनांनी बंडाचा इशारा दिल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय कौशल्य वापरून शिंदे त्यांची नाराजगी दूर करण्यात यशस्वी होतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.