औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. रावसाहेब दानवे हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहेत. वाढतं उन्ह आणि उष्म्यामुळे रावसाहेब दानवेंची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयात जाऊन रावसाहेब दानवेंची विचारपूस केली. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून कालच माघार घेतली. त्यानंतर ते आज दावनेंच्या भेटीला पोहोचले. ही राजकीय भेट नसली तरी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या भेटीला महत्त्व आहे.
आमदार अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे आता अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन ही चर्चा फेटाळली.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याच पक्षातील औरंगाबादचे लोकसभा उमेदवार सुभाष झांबड यांना विरोध करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काल सोमवारी त्यांनी अर्ज मागे घेतला. तसेच, ते काँग्रेसचं काम करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणाऱ्या कुणालाही मी मदत करु शकतो, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं.
काँग्रसने विधानपरिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले. त्यांनंतर त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठीही सुरु झाल्या.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, तर वंचित बहुजन आघाडीकडून आमदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड लढत आहेत. औरंगाबादमध्ये 23 एप्रिलला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.