नांदेड : नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Biloli) काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार जितेश अंतापूरकर यांना देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. भाजपने सेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे इथे अंतापूरकर विरुद्ध साबणे यांच्यात थेट लढत होईल, हे आता स्पष्ट झालं आहे.
Congress President Smt. Sonia Gandhi has approved the candidature of the following persons for bye-elections from the states listed below. pic.twitter.com/HnIVCOMAuu
— INC Sandesh (@INCSandesh) October 4, 2021
जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Deglur Vidhansabha Bypoll) 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी काँग्रेसने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तर याच ठिकाणी पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देखील रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये या पोट निवडणुकीच्या निमिताने दिवाळी आधीच फटाखे फुटायला सुरुवात झालीय.
गेल्यावेळी बिलोली देगलूर मतदारसंघात स्वर्गीय अंतापूरकर यांनी 89 हजार 407 मते घेत आपले प्रतिस्पर्धी सुभाष साबणे यांचा जवळपास वीस हजार मताच्या फरकाने पराभव केला होता. त्यावेळी साबणे यांना 66974 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्या रामचंद्र भरांडे यांना 12 हजार मतदान मिळालं होतं. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनांनंतर ही जागा काँग्रेसकडेच राहिल. मोठ्या फरकाने जितेश अंतापूरकर निवडून येतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.
पंढरपूर पोट निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळालं. त्यामुळे भाजपच्या अपेक्षा कमालीच्या उंचावल्या आहेत. स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी देगलूर मध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होईल, असा दावा केलाय. त्यामुळे भाजप ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. भाजपने माजी आमदार सुभाष साबणे यांना रिंगणात उतरवलं आहे.
स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला मतदारांची सहानुभूती मिळेल असा विश्वास काँग्रेसला आहे. काँग्रेसने या मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून विकास कामांचा धडाका उडवला होता. त्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक जिंकण्याचा विश्वास असल्याचे दिसतंय. तसेच भाजप मधल्या गटबाजीचा फायदा होईल, असाही विश्वास काँग्रेसला आहे.
(Congress announce Jitesh Antapurkar candidate for Deglur Biloli by poll election)
हे ही वाचा :
पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत, तीन वेळा आमदार शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर
Deglur – Biloli bypoll : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन