मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अखेर तिरंगी लढत निश्चित झाली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे, शिवसेनेकडून विनायक राऊत आणि काँग्रेसनेही नवीनचंद्र बांदिवडेकर यांचं नाव जाहीर केलंय. शिवसेनेकडून अजून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नसली तरी राऊतांचं नाव निश्चित मानलं जातंय. राऊतांकडून प्रचारही जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असेलल्या या मतदारसंघात तिरंगी लढत होणार यावर शिक्कामोर्तब झालंय.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राज्यातील महत्वाच्या 10 मतदारसंघापैकी एक आहे. या मतदारसंघातून शिवसेना आणि राणे कुटुंबाची प्रतिष्ठा इथे पणाला लागणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे निवडणूक लढवणार आहेत. तर शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत निवडणूक रिंगणात असतील. तर आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसच्या उमेदवाराला सोडला गेलाय. मात्र कोकण पदवीधर मतदारसंघात सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना राणेंनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी राष्ट्रवादी सध्या गेम प्लॅनमध्ये आहे. त्यामुळेच आघाडीचा उमेदवार असला तरी राष्ट्रवादी आपली सर्व ताकद नारायण राणेंच्या मागे उभी करण्याच्या रणनीतीमध्ये आहे.
नारायण राणे आणि तटकरे यांचे सख्य आजही कायम आहे. भास्कर जाधव चिपळुणातून राणेंना डोकेदुखी बनू शकतात. त्यामुळे राणेंच्या बाजूने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामधली राष्ट्रवादीची ताकद लावून राणेंना मैत्रीचा हात तटकरे देणार हे नक्की मानलं जातंय. त्यामुळे काही वेळा उघड, तर काही वेळा तटकरे राणेंना छुपा पाठिंबा देत राहतात.
एकीकडून भाजपकच्या कार्यकर्त्यांकडून कोंडी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा, यामुळे शिवसेनेला बालेकिल्यामधील टक्कर तेवढी सोपी नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या राणेंच्या मदतीच्या खेळीमुळे शिवसेना सध्या राणेंवर निशाणा साधून आहे. त्यामुळे राणे चौथी आघाडी शोधत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
वाचा – निलेश राणेंविरोधातला उमेदवार ठरला, काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर