मुंबई : काँग्रेसवर नाही, तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेकडे मदत पुनर्वसन खातं गेल्यामुळे नाराज होतो (Vijay Wadettiwar on Unhappiness), असं स्पष्टीकरण कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. दिल्लीतील नेत्यांशी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलणं करुन दिल्यानंतर वडेट्टीवारांच्या नाराजीचा तिढा सुटला. विजय वडेट्टीवार यांना मदत आणि पुनर्वसन खात्याचा अतिरिक्त भार मिळणार आहे. बी 1 बंगला या शासकीय निवासस्थानीच वडेट्टीवारांनी आज (शुक्रवारी) ओबीसी आणि खार जमिनी विकास विभागाचा चार्ज स्वीकारला.
माझ्या नाराजीचा विषय नव्हता. काँग्रेसच्या वाट्याला आलेलं खातं शिवसेनेकडे गेलं होतं. मदत आणि पुनर्वसन हे सर्वसामान्य माणसाशी संबंधित खातं आहे. ते शिवसेनेकडे गेलं होतं, असं विजय वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
ओबीसी जनगणनेबाबत निर्णय झाला, तेव्हा ओबीसी मंत्रालयाची धुरा सोपवलेले विजय वडेट्टीवार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना तोंड फुटलं होतं. ‘कुटुंबाचं वैयक्तिक काम होतं. मी बाळासाहेब थोरातांना सांगून गेलो होतो.’ असं वडेट्टीवार म्हणाले.
थोरातांची आयडिया चालली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर
खातेवाटपाचा निर्णय हायकमांडचा असतो, तो मला मान्य आहे. केंद्रातील नेते मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल यांच्याशी बोलणं झालं. शिवसेनेकडे असेलली खाती देऊ असं दोघांनीही सांगितलं. पुढेही मोठी जबाबदारी देऊ, असं आश्वासन दिल्लीतील नेत्यांनी दिल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केला.
मी नॉट रिचेबल नव्हतो, फोन सुरु होता, कुटुंबासोबत होतो. विधानसभा निकालापासून तीन महिने सत्तास्थापनेच्या कामात होतो. त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून कुटुंबासोबत होतो. आजही दुपारी जाणार आहे. मग काय, सोमवारपासून टी20 पुन्हा सुरु आहेच, असं वडेट्टीवार गमतीने म्हणाले.
ओबीसी जनगणनेबाबत राज्याकडून पाठपुरावा करु, मात्र सर्वस्वी निर्णय केंद्राचा आहे. न्याय मिळणार नाही, अशी खंत मराठा समाजाने मनात ठेवू नये, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करुन यशस्वी होऊ, अशी ग्वाही वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar on Unhappiness) दिली.
विजय वडेट्टीवारांना ओबीसी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, मदत पुनर्वसन या खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.