थोरातांची आयडिया चालली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

| Updated on: Jan 10, 2020 | 11:44 AM

बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्याशी बोलणी करुन दिली.

थोरातांची आयडिया चालली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे नाराज कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना यश आलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्याशी बोलणी करुन दिली. त्यानंतर वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी (Vijay Wadettiwar to take charge) दर्शवली आहे.

सोनिया गांधी यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेत विजय वडेट्टीवारांचा तिढा सुटला. वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनीच पुढाकार घेतला होता. सोनिया गांधींसोबत वडेट्टीवारांचं नेमकं काय बोलणं झालं, विजय वडेट्टीवार यांना नेमकं कोणतं आश्वासन देण्यात आलं, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता वडेट्टीवार या नाराजीनाट्यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

विजय वडेट्टीवार दुय्यम दर्जाची खाती दिल्याने नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे वडेट्टीवारांना खातं बदलून मिळणार का, याचीही चर्चा आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या नाकदुऱ्या काढण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले गेले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिलेला ‘ब 1’ हा वडेट्टीवारांचा आवडीचा बंगला देऊनही विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात आली. मात्र तरीही वडेट्टीवारांची नाराजी कायम होती.

विजय वडेट्टीवारांबाबत ‘त्या’ शब्दामुळे चूक झाली : अजित पवार

विजय वडेट्टीवारांना ओबीसी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, ‘भूकंप पुनर्वसन’ या खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र त्यात ‘मदत पुनर्वसन’ ऐवजी ‘भूकंप पुनर्वसन’ असं झालं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण करेक्शन करुन देऊ, असं सांगितल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

वडेट्टीवारांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्या बैठकीला दांडी मारली होती. इतर मंत्र्यांप्रमाणे सोमवारी त्यांनी पदभारही न स्वीकारल्यामुळे त्यांची नाराजी दिसून आली होती. वडेट्टीवार आग्रही असलेला बंगलाही आव्हाडांच्या वाट्याला गेल्यामुळे नाराजीत भर पडली होती.

विजय वडेट्टीवार भाजपात आलेच तर त्यांचे स्वागत आहे. वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे, असं भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्यामुळे वडेट्टीवार वेगळा निर्णय घेतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Vijay Wadettiwar to take charge