मुंबई: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे वाटत असतानाच बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी अनपेक्षित विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. चंद्रपूरच्या मतदारसंघात त्यांनी चक्क केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली होती. या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता. त्यामुळे अनेकदा बाळू धानोरकर हे नाव चर्चेत असते. (Congress Chandrapur MP Balu Dhanorkar political journey)
सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांचा जन्म 4 मे 1975 रोजी यवतमाळमध्ये झाला. त्यांनी कला आणि कृषी शाखेचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी चालवली. त्यानंतर भद्रावतीमध्ये बारही सुरु केला होता.
बाळू धानोरकर आधी चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून लोकसभेसाठीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदार पदाचाही राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले होते.
आक्रमक आणि स्पष्टवक्ता म्हणून बाळू धानोरकर राजकीय वर्तुळात ओळखले जातात. लोकांच्या जगण्यावर थेट परिणाम करणारी कामे करण्याला त्यांचे प्राधान्य असते. एकाच कामासाठी लोकांना वारंवार खेटे घालायला नको म्हणून बाळू धानोरकर परमनन्ट सोल्यूशन काढण्यावर भर देतात. पुन्हा निवडून येण्यापुरती कामे मी कधी करत नाही. लोकांना खोटी आश्वासने देत नाही. माझ्याकडून काम होणार नसेल तर मी लोकांना तसे स्पष्टपणे सांगतो, हा बाळू धानोरकरांचा खाक्या आहे. त्यांची ही गोष्टच अनेकांना भावते.
बाळू धानोरकर हे सुरुवातीपासूनच राजकारणात कोणताही धोका पत्कारण्याची तयार ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भद्रावती नगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज संसदेपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
बाळू धानोरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याच कारणावरून त्यांना दोनवेळा तडीपार करण्यात आले होते. या काळात अनेकजण मला ‘तुम्हारा आदमी तडीपार है’, असे ऐकवून दाखवत. त्या काळात मला आणि मुलांना त्यांची भेट घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागायचे, अशी आठवण प्रतिभा धानोरकर सांगतात.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2004 नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. बाळू धानोरकर यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी उमेदवारीच्या आड आली. काँग्रेसच्या यादीत धानोरकरांना तिकीट नाकारले गेले. मोठा गदारोळ झाला. धानोरकर-वडेट्टीवार-अशोक चव्हाण त्रिकूट मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारी पोहोचले. तोवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रपूरची जागा राष्ट्रवादीला द्या असा निरोप राहुल गांधींना दिला होता.
मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऐनवेळी चक्रे फिरवून बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळवून दिली. त्यासाठी धानोरकर यांच्या समर्थकांनी अगदी राहुल गांधी यांच्यापर्यंत फिल्डिंग लावली होती. विजय वडेट्टीवार यांनी बाळू धानोरकर हे कसे विनिंग कँडिटेट आहेत, हे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना पटवून दिले.
2019 च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यात दोन खासदार निवडून आले होते. मात्र, 2019 मध्ये हा आकडा फक्त एका खासदारावर आला. ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये विजय मिळवून पक्षाची लाज राखली.
खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली होती. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे बाळू धानोरकर यांनी म्हटले होते.
भाजप ही आमची पैदाईश आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प हद्दपार झाले. त्याप्रमाणे मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय मी राहणार नाही. पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्ष बाकी आहेत. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकद माझ्यात आहे.
आगामी तीन वर्षांच्या कालखंडात धानोरकर तुम्ही वाराणसीत जा, असा आदेश पक्षाने द्यावा. जर मी गेलो नाही आणि मोदींचा ट्रम्प केला नाही तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही, असा दावा त्यांनी केला होता.
(Congress Chandrapur MP Balu Dhanorkar political journey)