अकोला : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. भाजपकडून (BJP) मुरजी पटेल (Murji Patel) यांना तर शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाला बाळासाहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मात्र आता यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेची होती. मग बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपला उमेदवार उभा न करता भाजपाच्या उमेदवाराला पांठिबा देण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरूनच विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील उमेदवारीबाबत काही प्रश्न उपस्थित करत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
अतुल लोंढे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब यांचं नाव घायचं आणि बाळासाहेब यांनाच धोका द्यायचा असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. तुम्ही जर स्वत:ला शिवसेना मानता, भाजप देखील म्हणत की एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. तर मग अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेची होती. मग तुम्ही तुमचा उमेदवार का उभा केला नाही. भाजपाला का पाठिंबा दिला, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीवर भाष्य केलं आहे. जसे भाजपाला उद्धव ठाकरे नको होते, तसेच भाजपाला आता एकनाथ शिंदे हे देखील नको आहेत. सर्व परिस्थिती अनुकूल दिसली तरच भाजप निवडणुकांमध्ये शिंदे गटासोबत युती करेल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.