मुंबई : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडीचं सूत्र जवळपास निश्चित झालं असलं तरी अहमदनगरसाठी घोडं अडलेलं दिसतंय. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आमची परिस्थिती चांगली आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादीकडूनही या जागेसाठी रस्सीखेच चालूच आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली. यात राज्यातील 26 मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर उमेदवार कोण असावेत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघात निश्चित केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवू. तिथे उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय होईल. चेहरा बदलण्याची गरज असेल तिथे चेहरा बदलला जाईल, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
मुंबईतील दोन – तीन जागांवर चर्चा व्हायची आहे. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे आमची परिस्थिती राष्ट्रवादीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे, असं म्हणत नगरच्या जागेसाठी रस्सीखेच होणार याचे संकेत अशोक चव्हाणांनी दिलेत.
”प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक”
भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याची आमची मानसिकता असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले. मतांची विभागणी होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही चर्चेला त्यांच्या घरी गेलो होतो. आतापर्यंत सहा बैठका झाल्या. आता त्यांनी सकारात्मकता दाखवावी, असं आवाहन अशोक चव्हाणांनी केलंय. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर 12 जागांवर अडून बसल्याचं बोललं जातंय.
नगरच्या जागेसाठी रस्सीखेच कशासाठी?
अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरं तर आघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचं घट्ट जाळं या मतदारसंघावर आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून ते खासदार आहेत. आघाडीत राष्ट्रवादीकडून ही जागा 2014 ला लढवण्यात आली. पण मोदी लाटेत गांधींच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुपडासाफ झाला.
आघाडीत नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र या जागेवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे काँग्रेसकडून आग्रही आहेत. जागा काँग्रेसला सोडली नाहीतरी लढण्याचा निर्णय सुजय विखेंनी घेतलाय. वेळप्रसंगी काँग्रेस सोडण्याचं नुकताच त्यांना ईशारा दिलाय. सुजय विखेंची भाजपाकडूनही चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा आहेत. काहीही असले तरी सुजय यांनी प्रत्येक तालुक्यात झेडपी गटात वैद्यकीय शिबीरं घेतली आहेत. त्यामुळे सुजय विखेंनी जनसंपर्क वाढवला असून तयारी सुरु केली आहे.
संबंधित बातम्या :