गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेचं तिकीट दिल्यानंतर आज विधीमंडळात तातडीची आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला काँग्रेसचे फक्त 36 आमदारच उपस्थित होते. बैठक संपली तरी सात आमदार आले नाहीत. त्यातील काही आमदारांनी बैठकीला न येण्याचं कारण कळवलं आहे. यातीलच अशोक चव्हाण समर्थक तीन आमदारही आले नाहीत. त्यांच्याकडून बैठकीला न येण्याचं कारण सांगितलं गेलं नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसणार का? अशी चर्चा आता या निमित्ताने रंगली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस विधीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे 36 आमदार उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये बस्तान बसवलं आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेस एकसंघ असून आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत गेलेले नाहीत, असा संदेश काँग्रेसला द्यायचा होता. मात्र, या बैठकीला सात आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
जितेश अंतापूरकर, माधवराव जवळगावकर, अस्लम शेख, झिशान सिद्दिकी, मोहन हंबर्डे, अमित देशमुख आदी आमदार बैठकीला गैरहजर होते. आणखी एक आमदार वाटेत असल्याचा निरोप आला. काही आमदारांनी बैठकीला न येण्याचं कारण कळवलं. पण तीन आमदारांनी काहीच कळवलं नसल्याचं सांगितलं जात आहे. हे तिन्ही आमदार अशोक चव्हाण यांचे समर्थक असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे तीन आमदार आहेत काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे अर्ज भरणार आहेत. हंडोरे हे सहकुटुंब विधानभवनात आले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे आमदार आणि कार्यकर्तेही आहेत. यावेळी अजय चौधरी ठाकरे गटाकडून उपस्थित आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत राज्यसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील सहा रिक्त जागांसाठी अर्ज भरले जात आहेत. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण, अजित गोपछडे यांना, शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना तर अजितदादा गटाने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी अर्ज दिला आहे. भाजपने चौथ्या जागेसाठी उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना रोखण्यसााठी बॅरेकेटिंग करण्यात आले आहेत. उमेदवारी प्रक्रिया पार पडेपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे.