काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची ‘कोरोना’वर मात

| Updated on: May 31, 2020 | 10:47 AM

गेले 20 दिवस मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. (Congress Ex Minister Chandrakant Handore won battle against COVID)

काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची कोरोनावर मात
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी ‘कोरोना’वर मात केली. गेले 20 दिवस मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. काल रात्री डिस्चार्ज घेऊन हंडोरे घरी आले, तेव्हा कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या वातावरणात त्यांचे स्वागत केले. (Congress Ex Minister Chandrakant Handore won battle against COVID)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच चंद्रकांत हंडोरे चेंबुरच्या जनतेला मदत करण्यासाठी सरसावले. विशेषतः पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील जनतेच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी ते दिवसरात्र मेहनत घेतली. या कालावधीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

हंडोरे यांच्या तीन चाचण्या कोरोना पॉझिटीव्ह आल्याने धाकधूक वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर चंद्रकांत हंडोरे यांची चौथी टेस्ट घेण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाड यांची ‘कोरोना’शी यशस्वी झुंज

चंद्रकांत हंडोरे कोरोनामुक्त झाल्याचं समजताच कार्यकर्त्यांच्या अंगातही उत्साह संचारला. हंडोरे हे चेंबूरचे माजी आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत.

याआधी, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ‘कोरोना’शी यशस्वी झुंज दिली. “कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे.” असं आव्हाड यांनी 10 मे रोजी जाहीर केलं होतं.

 

दुसरीकडे, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशोक चव्हाण हे लॉकडाऊनच्या काळात दोन महिने नांदेडमध्येच होते. मात्र मध्यंतरी विधानपरिषद निवडणुकीसाठी ते मुंबईला आले होते. चव्हाण पुन्हा नांदेडला गेले, तेव्हा तिथे त्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी केली. गेल्या आठवड्यात ही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे बारा तास रस्तेमार्गे प्रवास करुन ते उपचारासाठी पुन्हा मुंबईला आले. अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर आहे.

(Congress Ex Minister  Chandrakant Handore won battle against COVID)