नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. भाजप नेते किरण रिजीजू यांच्या अरुणाचल प्रदेशातील जागेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यामुळेच अंतिम निकालासाठी विलंब झाला. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303, तर काँग्रेसने 52 जागा मिळवल्या आहेत. या निकालाने काँग्रेसवर पुन्हा एकदा मोठी नामुष्की ओढावली आहे. सलग दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाला मुकावं लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने 52 जागा जिंकल्या आहेत. पण संसदीय नियमानुसार, विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाला किमान 10 टक्के म्हणजे 55 जागांची आवश्यकता आहे. अन्यथा विरोधी पक्षनेते पद मिळत नाही. याबाबत लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे. या पदावरील नेत्याचा केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवड समितीमध्ये समावेश आहे.
2014 लाही काँग्रेसला केवळ 44 जागा जिंकल्यामुळे विरोधी पक्षनेते पद मिळालं नव्हतं. काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही न मिळण्याची ती पहिलीच वेळ होती. पंडित जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. त्यामुळे तेव्हा संसदेत विरोधी पक्षनेता नव्हता. राजीव गांधी 1984 ला पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेसने 404 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी केवळ 3 जागा जिंकलेल्या टीडीपीला विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं होतं. 2014 लाही काँग्रेसने याच घटनेचा दाखला दिला होता.
2019 च्या पक्षनिहाय जागा
आप – 01
एआयएडीएमके – 01
एमआयएम – 02
टीएमसी – 22
बसपा – 10
सपा – 05
भाजप – 303
शिवसेना – 18
बीजेडी – 12
सीपीआय – 02
सीपीआयएम – 03
डीएमके – 23
काँग्रेस – 52
जेडीएस – 01
नॅशनल कॉन्फरन्स – 03
जेडीयू – 16
लोक जनशक्ती पार्टी – 06
राष्ट्रवादी काँग्रेस – 05
अकाली दल – 02
टीआरएस – 09
टीडीपी – 03
वायएसआर काँग्रेस – 25
इतर पक्ष – 14