ठाणे : लोकसभा निवडणुकीत सर्वत्र सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत संकट सुरु आहे. विविध पदाधिकारी राजीनामा देत आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनीही राजीनामा दिलाय, जो अजून स्वीकारलेला नाही. पण स्थानिक पातळीवरही काँग्रेसमागे संकटं सुरुच आहेत. कल्याण काँग्रेस कार्यालयाच्या भूखंडाचा कर भरला नसल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेने जप्तीची नोटीस बजावली आहे.
कल्याण पश्चिम येथील टिळक चौक परिसरात काँग्रेसचं कार्यालय होतं. काही वर्षांपूर्वी अतिधोकादायक झाल्याने ती इमारत पाडण्यात आली. नवीन इमारतीचं भूमीपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. या जागेच्या चारही बाजूनी संरक्षण भिंत उभारली. मात्र त्यानंतर एकही विट रचण्यात आली नाही. अंतर्गत गटबाजीमुळे इमारत काही उभी राहू शकली नाही. शिवाय आजतागायत या मोकळ्या जागेचा करच भरला गेलेला नाही. दरवर्षी नोटीस बजावूनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या कर वसुलीच्या नोटिसा केराच्या टोपलीत टाकल्या. आता मात्र महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत 13 लाख 22 हजारांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी या जागेची जप्ती करण्याची नोटीस बजावली आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावर लवकरच उत्तर शोधणार असल्याचं सांगितलंय. काही तांत्रिक समस्यांमुळे इमारतीचं काम होऊ शकलं नाही. प्रश्न ओपन लँड टॅक्सचा आहे. संबंधित जागा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासाठी आहे. त्या ठिकाणी आम्ही नागरी किंवा व्यावसायिक विकास करून विकण्यासाठी ही जागा ठेवलेली नाही. जो काही कर आहे तो माफ करण्याची मागणी आम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेला करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार देखील करणार असल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय.