जयपूर (राजस्थान): धावत्या गाडीमुळे अंगावर चिखल उडल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल, एव्हाना आपल्याकडूनही चिखल उडाला असेल. मात्र धावत्या गाडीने चिखल उडवणं काँग्रेसच्या माजी जिल्हा प्रमुखाच्या चांगलंच अंगलट आलं. गाडीमुळे चिखल उडाल्याने संतापलेल्या नागरिकांनी या काँग्रेसच्या माजी जिल्हा प्रमुखाला चक्क नाक घासून माफी मागायला लावली. राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या माजी जिल्हा प्रमुख भगवतीलाल रोत यांच्यावर ही नामष्की ओढवली. डुंगरपूर जिल्ह्यातील भेमई-झोंसवा परिसरात ही घटना घडली.
काँग्रेसचे माजी जिल्हा प्रमुख भगवतीलाल रोत हे मंगळवारी डुंगरपूर येथून प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या सभेतून परतत होते. त्यावेळी भेमई गावातून जाताना रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार लोकांवर त्यांच्या गाडीमुळे चिखल उडाला. यानंतर संतापलेल्या त्या चौघांनी रोत यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि झोंसावा गावात त्यांनी रोत यांच्या गाडीला घेरले. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या चार लोकांनी रोत यांना चिखल उडवल्याबाबत माफी मागण्यास सांगितले.
यादरम्यान त्या ठिकाणी अनेक लोक जमले. त्यानंतर त्यांना माफीच नाही तर जमिनीवर नाक घासत माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. नागरिकांची जमलेली गर्दी बघता रोत यांनी अक्षरश: रस्त्यावर नाक घासत माफी मागितली.
तिथे उपस्थित काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर पोस्ट केला.