नवी दिल्ली: नाणार प्रकल्पावरून (nanar refinery project) महाराष्ट्रात पुन्हा एकदा घमासान सुरू आहे. नाणार प्रकल्प व्हावा म्हणून नाणार समर्थकांनी जोर लावला असून विरोधकांनी निदर्शने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही प्रकल्पाला किंवा विकासकामाला खिळ घालण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच हा प्रकल्प विदर्भात व्हावा म्हणून काँग्रेसचा (congress) एक नेता आपल्याला भेटला होता. या नेत्याने विदर्भात प्रकल्प आल्यास त्याचं स्वागत करू असं सांगितलं. तसेच या नेत्याने नाणार प्रकल्प विदर्भात नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे. हा प्रकल्प कुठेही होत असेल आणि त्याला कुणाचा विरोध नसेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
त्या प्रकल्पाला किंवा कोणत्याही विकास कामाला राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतला नाही. पण कोकणात ज्या भागात हा प्रकल्प होतो, तिथली शेती, फळबागा, मासेमारीचं नुकसान होणार आहे. त्यामुळे तिकडच्या मच्छिमार समाजाचा या प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पामुळे त्यांची शेती, फळबागा आणि मासेमारी नष्ट होतील यासाठी त्यांचं मोठं आंदोलन सुरू होतं. आजही सुरू आहे. पण तो प्रकल्प होऊच नाही असं नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख मला भेटून गेले. माजी आमदार आहेत. तरुण नेते आहेत. ते म्हणाले हा प्रकल्प विदर्भात आला तर आम्ही त्याचं स्वागत करू. समृद्धी महामार्ग होतोय, त्या महामार्गाच्या आसपास काही पाण्याच्या जागा आहेत. जल प्रकल्प आणि नद्या आहेत. तिथे हा प्रकल्प झाला तर त्याचा फायदा महाराष्ट्र आणि विदर्भाला होईल, असं आशिष देशमुख म्हणाले. याचा अर्थ विरोध प्रकल्पाला नाहीये. लोकांचा विरोध आहे तो रोजी रोटी, फळबागा आणि शेतीचं नुकसान होऊ नये यासाठी आहे. मुख्यमंत्र्यांनी जर प्रकल्पासाठी दुसरी जागा सूचवली असेल तर त्याच भूमिकेतून सूचवली असेल. बाकी यातील तांत्रिकबाबी मला माहीत नाही. देशमुखांनी ही भूमिका मुख्यमंत्र्यांकडेही मांडली आहे. तज्ज्ञांची समिती नेमावी असंही त्यांचं म्हणणं आहे. प्रकल्प कुठेही झाला आणि त्याला विरोध नसेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
VIDEO: सदिच्छा भेट होती, पण राजकीय चर्चा झाली, Varun Gandhi यांच्या भेटीनंतर राऊतांनी उडवला धुरळा
Maharashtra News Live Update : औरंगाबादेत पेट्रोल डिझेल दरवाढीचा कळस