गांधीनगर : गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता अशी ओळख असलेल्या आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले हार्दिक पटेल यांच्यावर भर सभेत हल्ला झाला. भाषण करत असलेल्या हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावण्यात आली. तरुण गुर्जर असे हार्दिक पटेलांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. कालच भाजप प्रवक्त्यावर बूट हल्ला झाला होता, त्यानंतर आज गुजरातमध्ये काँग्रेस नेते हार्दिक पटेलच्या श्रीमुखात भडकावण्याचा प्रकार घडला आहे.
गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये आज काँग्रेसतर्फे एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हार्दिक पटेल यांचे भाषण सुरु होण्यापूर्वी अचानक तरुण गुर्जर नावाचा व्यक्ती स्टेजवर चढला आणि हार्दिक यांना काही कळायच्या आतच त्याने हार्दिक यांच्या कानशिलात लगावली. या प्रकारानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला पकडून मारहाण केली.
काल भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट भिरकावल्याचा प्रकार घडला होता. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत असताना या सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर आज गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये हार्दिक पटेल यांच्या भर सभेत कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेनंतर हार्दिक पटेल यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना “या प्रकरणानंतर आम्ही घाबरणार नाही, आमची लढाई अशीच सुरु राहणार, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपकडून असे प्रकार मुद्दाम घडवले जात आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.