नवी दिल्लीः देशात लवकरच गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन राज्यांसाठी विधानसभा निवडणुका होणार आहेत. शुक्रवारी या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार होता. मात्र फक्त हिमाचल प्रदेशचाच मतदान आणि मतमोजणीचा कार्यक्रम जाहीर झाला. गुजरातचा (Gujrat Assembly) कार्यक्रम होल्डवर ठेवण्यात आला. यामागे नेमकं काय कारण आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हाच धागा पकडत निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) निशाणा साधलाय.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणुक आयोगावर यावरून टीका केली. गुजरातमध्ये अजून आणखी काही कार्यक्रमांचं उद्घाटन करायचं असेल किंवा आणखी आश्वासनं द्यायची असतील. आम्हाला यात फार काही आश्चर्य वाटत नाही, असं खोचक वक्तव्य जयराम रमेश यांनी केलंय.
शुक्रवारी निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. मात्र गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. यासाठीचं कारण निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रात देण्यात आलंय. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 2023 मध्ये 18 फेब्रुवारी रोजी समाप्त होतोय. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होतील, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. आधीच्या प्रथांचं पालन केल्याचं आयोगाने म्हटलंय.
obviously this has been done to give more time to the PM to make some mega promises & carry out more inaugurations. Not at all surprising. https://t.co/LF1Vhw4WAw
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 14, 2022
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हिमाचल प्रदेशमधील हवानामाचंही कारण दिलं. इथलं हवामान बदल हा मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे या निवडणुका लवकर व्हाव्यात, बर्फवृष्टीचा अडथळा येऊ नये, असा उद्देश यामागे असल्याचं आयोगाने म्हटलंय.
मात्र यापूर्वीच्या गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या कार्यकाळात तर 60 दिवसांचा फरक होता. तरीही या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या, असं काँग्रेस नेत्यांकडून दर्शवण्यात येतंय…
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान 12 नोव्हेंबर रोजी होईल. तर 8 डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील. हिमाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारी 2023 रोजी समाप्त होतोय.