मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडोखोरी केली आहे. आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठा पेच निर्माण झाला असून, महाविकास आघाडीचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्याने आता महाविकास आघाडीतील उर्वरीत दोन्ही पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सावध झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (congress) केंद्रीय निरिक्षक कमलनाथ (Kamalnath) हे राज्यात दाखल झाले आहेत. ते मुंबईत दाखल झाले आहेत. कमल नाथ आधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. काँग्रेसमध्ये सर्व अलबेल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कमलनाथ यांनी या सर्व प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधला आहे. ते सैद्याचे राजकारण करतात. देशभरात त्यांच्याकडून असाच प्रकार सुरू आहे. झारखंडमध्येही तेच झालं, मध्यप्रेदेशच्या जनतेने देखील हेच अनुभवलं. हे लोकशाहीविरोधी आहे. आमच्या संविधानाच्याविरोधी आहे. अशा राजकारणाची सुरुवात ही पुढे धोक्याची घंट ठरणार आहे. शिवेसेनेचे आमदार फुटले आहे, आता त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे शिवसेनेने ठरवावे. आमच्या गोटात सर्व अलबेल आहे. काँग्रेसचे आमदार विकावू नाहीत. ते काय काँग्रेससोबत राहातील असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया यावेळी कमलनाथ यांनी दिली आहे. कमलनाथ हे आधी या सर्व घडामोडींबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजूनही एकनाथ शिंदे हे परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आहेत. आज सकाळीच त्यांच्यांशी तासभर चर्चा झाली. आमदारांशी देखील चर्चा सुरू आहे. सगळे आपलेच आहेत. लवकरच ते पुन्हा शिवसेनेत परततील असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे ईडी, सीबीआयच्या दबावाला बळी पडले आणि भाजपाच्या जाळ्यात फसले असे सामनामध्ये म्हटले आहे.