मुंबई: संजय राऊत हे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, असा रोखठोक इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. तसेच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवावी, असेही नाना पटोले यांनी सांगितले. (Mahavikas Govt is in power due to congress says Nana Patole)
ते शनिवारी भिवंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी UPA चे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावे, अशी मागणी करणाऱ्या संजय राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले. संजय राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पडला आहे. दिल्लीत यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली व त्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे यूपीएचे नेतृत्व सोपवावे, ही केलेली मागणी हास्यास्पद आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल . तर संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ‘सामना’चे संपादक आहेत हे माहिती आहे. परंतु ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला.
संबंधित बातम्या:
संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का; नाना पटोलेंनी फटकारले
(Mahavikas Govt is in power due to congress says Nana Patole)