नागपूर : महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याचं सातत्याने समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आज मुख्यंत्र्यांची भेट घेणार होते, मात्र काही कारणाने ही भेट टळली आहे. आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मग अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्यानेही निर्णय प्रक्रियेवरुन नाराजी व्यक्त केली आहे. (Nitin Raut talks about Congress upset)
राज्याचे ऊर्जा मंत्री आणि गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जाणारे नेते नितीन राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याने नाराजी व्यक्त केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
वाचा : ‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त
नितीन राऊत म्हणाले, “राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही. काँग्रेसच्या बऱ्याच मंत्र्यांचा हा अनुभव आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी कळवणार आहे. काँग्रेसच्या काही आमदारांचीही नाराजी आहे”
काँग्रेस नेते-मुख्यमंत्र्यांची भेट पुढे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे वारल्याने काँग्रेस नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक रद्द झाली आहे. पुढील बैठकीबाबत नंतर कळविण्यात येईल, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसची नाराजी व्यक्त करणार आहेत.
अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त
“ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही”, अशी नाराजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. (Ashok Chavan nervous on Thackeray government). “तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार”, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले होते.
तीन भावांमध्ये धुसफूस, आम्ही तर तीन पक्ष : थोरात
तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसापूर्वी म्हटलं होतं. सत्तेत सहभागी असूनही काँग्रेसला विचारात घेतले जात नसल्याने पक्षाचे नेते नाराज आहेत. “मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत” असं बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी एक्स्क्लुझिव बातचीत करताना सांगितलं.
(Nitin Raut talks about Congress upset)
संबंधित बातम्या
‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त
Balasaheb Thorat | तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात