कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवडे येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसने तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सांगलीतली बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु असतानाच हातकणंगलेत पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीकडून धैर्यशील माने, काँग्रेस-राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खासदार राजू शेट्टी लढत आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे लोकसभेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पक्षाने तिकीट न दिल्यास जाहीरपणे बंडखोरी करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं आवाडे यांनी सांगितलंय. सांगलीत दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा यांचे नातू प्रतिक पाटील यांनी तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाला रामराम ठोकलाय. कोल्हापूर जिल्ह्यातही माजी मंत्र्याच्या मुलानेच बंडाचा इशारा दिल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.
राहुल आवाडे यांची मनधरणी करण्यासाठी काही नेत्यांनी त्यांची भेट घेतली. पण राहुल आवाडे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. राजू शेट्टी यांनी आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. राहुल आवाडे हे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव आहेत. राजू शेट्टी गटाची यामुळे चिंता वाढली आहे.