भोपाळ : निवडणुकांचे निकाल पाहून मध्य प्रदेशात एका जिल्हा काँग्रेस अध्यक्षाला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सीहोर तालुक्यातील मतमोजणी केंद्रावर सीहोरचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह ठाकूर हे मतमोजणीची पाहणी करण्यासाठी आले होते. तिथे अचानक ते बेशुद्ध होऊन पडले.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह ठाकूर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मतमोजणी केंद्रावर पोहोचले. तिथे निवडणुकांचे निकाल पाहून त्यांना धक्काच बसला आणि ते चक्कर येऊन खुर्चीवर पडले. त्यानंतर रतन सिंह ठाकूर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी रतन सिंह ठाकूर यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
देशात लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल आज लागतो आहे. त्यासाठीची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत आलेल्या आकड्यांनुसार, भाजप देशात आघाडीवर आहे. भाजपने आतापर्यंत 300 जागांचा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे यंदाही मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे, काँग्रेसला मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये परावभ पत्करावा लागत आहे. काँग्रेसचे बडे नेतेही या निवडणुकीत तोंडावर पडले आहेत.
लोकसभा निवडणुका 2014 मध्ये मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली होती. इथल्या 29 लोकसभा जागांपैकी 27 जागांवर भाजप जिंकून आली होती. तर काँग्रेसच्या पदरात फक्त दोन जागा पडल्या होत्या. तसंच काहीसं चित्र यावेळीही बघायला मिळत आहे.