Sanjay Nirupam | मेहतांना CMO मध्ये घेऊन काँग्रेसला खिजवले, ही कसली आघाडी? : निरुपम

| Updated on: Jun 25, 2020 | 5:05 PM

"शिवसेनेला काँग्रेसची फिकीर आहे की नाही? ही कशी आघाडी?" असा सवाल संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे. (Congress Leader Sanjay Nirupam on Shivsena Ajoy Mehta Transfer)

Sanjay Nirupam | मेहतांना CMO मध्ये घेऊन काँग्रेसला खिजवले, ही कसली आघाडी? : निरुपम
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने काँग्रेसला खिजवले, अशा शब्दात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्वपक्षाचे कान टोचले आहेत. (Congress Leader Sanjay Nirupam on Shivsena Ajoy Mehta Transfer)

“महाराष्ट्राच्या ज्या मुख्य सचिवांमुळे काँग्रेसचे सर्व मंत्री त्रस्त असल्याचं बोललं जातं, त्यांच्या निवृत्तीनंतर (30 जून) त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागाराची भूमिका देण्याचा निर्णय काँग्रेसला खिजवणारा आहे. शिवसेनेला काँग्रेसची फिकीर आहे की नाही? ही कशी आघाडी?” असा सवाल संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीतील वादानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. तर अजोय मेहता यांच्याकडे ठाकरे सरकारने वेगळी जबाबदारी दिली आहे. मेहता यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून एकाच दगडात दोन लक्ष्यभेद, काँग्रेस-राष्ट्रवादीची मर्जीही राखली, मेहतांची विशेष पदी नेमणूक

अजोय मेहतांवरुन महाविकास आघाडीत कुरबूर

अजोय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत कुरबूर पाहायला मिळत होती. अजोय मेहता यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध होता. बाळासाहेब थोरात यांनी तर उघड उघड बोलत, अधिकारी सर्वस्वी नाहीत, तर मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवपदाचा निर्णय घेताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विचारात घ्यावं, असं काँग्रेसने म्हटलं होतं.

संजय कुमार मुख्य सचिवपदी

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

कोण आहेत अजोय मेहता?

  • अजोय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ते कार्यरत होते.
  • अजोय मेहता राज्यात पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव होते.
  • अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत.
  • आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

संबंधित बातम्या :

Ajoy Mehta | अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती

IAS Sanjay Kumar | कोण आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव संजय कुमार?

पनवेल मनपा आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्तांचीही बदली

(Congress Leader Sanjay Nirupam on Shivsena Ajoy Mehta Transfer)