नवी दिल्ली : काँगेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ या आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. दोन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे 24 मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व अपात्र ठरवणारी अधिसूचना जारी केली. यामुळे आता राहुल गांधी यांना पुढील आठ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. मात्र, न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला तसेच, त्यांना उच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी त्यांच्या शिक्षेला ३० दिवसांची स्थगितीही देण्यात आली.
सुरत न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतरही राहुल गांधी यांनी माफी मागायला मी गांधी आहे, सावरकर नाही असे म्हणत आणखी एक नवा वाद ओढवून घेतला. त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. भाजप – शिवसेनेने या वक्तव्यावरून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढली आहे. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
राहुल गांधी आज कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सूरत न्यायालयात आव्हान देणार आहेत. याचवेळी राहुल गांधी यांच्याकडून जामिनाची याचिकाही सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे, सूरत कोर्टाकडून आता राहुल गांधी यांना जेल मिळणार की बेल याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातील काँग्रेसचे दिग्गज नेते सूरतमध्ये जाणार आहेत. दुपारी २ वाजता ते सुरतला पोहोचणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली.
दरम्यान, राहुल गांधी हे सुरतला निघण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. या दोघींच्या भेटीमुळे राहुल गांधी यांना दिलासा मिळाला. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा या स्वतः राहुल गांधी यांच्यासोबत सुरत न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सुरत न्यायालयात जाणार आहेत. यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल स्वतः सुरतला जात आहेत. २ वर्षांच्या शिक्षेविरुद्ध अपीलच्या नावाखाली देशात सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. तसेच, एकप्रकारे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशा आरोप भाजपने केला आहे.