मुंबई : विधानसभा निवडणुकीला (Assembly Election) अगदी कमी कालावधी बाकी असतानाच काँग्रेसला (Congress) आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे राज्यसचिव विजय पाटील (Vijay Patil) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. विजय पाटील वसई विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. शिवसेना देखील बहुजन विकास आघाडीचे (BVA) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना शह देण्यासाठी विजय पाटलांना वसई विधानासभेतून लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजय पाटील हे वसईतील प्रभावी राजकीय नेते आहेत. आग्री, वाढवळ, ख्रिश्चन समुदायांचा त्यांच्या पाठीशी चांगला जनाधार असल्याचंही बोललं जातं. पाटील हे वसईतील उद्योजक आहेत. त्यांना स्वच्छ प्रतिमेचा राजकीय चेहरा असंही बोललं जातं.
वसई विधानासभेतून स्वतः हितेंद्र ठाकूर, तर नालासोपारा विधानासभेतून त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर आमदार आहेत. बोईसर मतदारसंघातूनही हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाचे विलास तरे हेच आमदार होते. मात्र, मागील आठवड्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ठाकुरांना धक्का दिला.
शिवसेनेकडून विरोधी उमेदवारांना शह देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नालासोपारा विधानासभेत विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांना शह देण्यासाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी वसई विधानसभा मतदारसंघातून विजय पाटील आणि श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पंडित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे.
मागील 30 वर्षांपासून वसई विरार नालासोपाऱ्यात एकहाती अधिराज्य गाजवणाऱ्या हितेंद्र ठाकूरांना या विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर मिळेल, असंच सध्याच्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.