मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 40 हजार कोटी रुपये केंद्राकडे पाठवल्याचा दावा भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला. त्यानंतर या मुद्द्यावरुन फडणवीसांवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील फडणवीसांवर सडकून टीका केली (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis). देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कर्जात असताना महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे केंद्रात पाठवले असतील तर त्यांना राज्यात फिरु देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी 40 हजार कोटी रुपये परत केंद्राकडे परत पाठवल्याचं विधान भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे. फडणवीस यांनी असं केलं असेल, तर ते महाराष्ट्रद्रोही काम आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे परत गेले असतील, तर महाराष्ट्र फडणवीस यांना माफ करणार नाही. त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.”
राज्य कर्जात आहे. त्यात केंद्र सरकारने दिलेला मदत निधी परत पाठवणे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यावर कर्जाचा बोजा वाढवत विकासकामं सुरु केली होती. गुजराती बंधूंनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई नष्ट करण्याचा डाव सुरु केला आहे. बुलेट ट्रेन त्याच डावाचा एक भाग आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली मुंबई तोडण्याचा डाव होता, असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
“पंकजा मुंडेंचा यांनी गेम केला, आता त्या यांचा नेम घेतील”
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपवर पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर संपवल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याशी राजकारण झाले. पंकजा मुंडे यांचा गेम करण्यात आला. ज्यांनी हा गेम केला त्यांच्यावरही पंकजा मुंडे नक्की नेम धरतील. जर खरंच काही गोलमाल नसता, तर भाजपमधील दोन नेत्यांना पंकजा मुंडे कुठेही जाणार नाही हे सांगण्याची वेळ आली नसती. बहुजनांना डावलून सत्ता चालवू शकत नाही हे देखील पंकजा मुंडे दाखवून देतील.”
मंत्रिमंडळ विस्तार कसा करायचा याचा सर्वस्वी अधिकार पक्ष श्रेष्ठींना आहे. पक्ष श्रेष्ठींकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू आहे. दोन तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
चेतक महोत्सवात मोठा घोटाळा झाला आहे. भाजप सरकार आपल्या मंत्र्यांना नेहमी क्लीन चिट देत आलं. मात्र, चेतक महोत्सव घोटाळ्यातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही मागणी करु, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.