मनोज गाडेकर, शिर्डीः महाराष्ट्रातील शिंदे-भाजप (Shinde-BJP) सरकारमध्ये नेमकं काय सुरु आहे. होणार होणार अशी शक्यता वर्तवल्यानंतरही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expanssion) का होत नाहीये? या प्रश्नांवर काँग्रेसच्या (Congress) माजी मंत्र्याने मोठं भाष्य केलंय. शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेक आमदार मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर दोन पक्षांमधील धुसफूस वाढेल.. सरकार आधीच अस्थिर आहे, मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते कोलमडेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे यांची शिवसेना पक्षाचे नेते बिथरले आहेत. राज्यात बदलाचे वारे आहे, त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा सरकार कोलमडण्यासाठी कारण ठरू शकतो, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय.
विधान परिषद निवडणुकांनंतर राज्यात बदलाचे वारे आहेत.महाविकास आघाडीच्या यशामुळे सगळेच बिथरले आहेत. सरकार टिकेल की नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी सरकार पडेल आणि मध्यावधी निवडणुका लागू शकतात, अशी शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नाराज झालेल्या अनेक आमदारांची धुसफूस वारंवार समोर आली आहे. आता दुसऱ्या विस्तारात आमदारांची नाराजी सरकारला झेपणार नाही, सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. पण मविआमध्ये वंचित येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल कुणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्यांच्या भूमिकेवर ते ठाम असतात. मागे पुढे पाऊल घेत नाहीत. हुकूमशाही पद्धतीला शह द्यायचा असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यावं.. महाराष्ट्र आणि देशात परिवर्तनासाठी प्रकाश आंबेडकरांनी साथ द्यावी, असं वडेट्टीवार म्हणाले.