मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागासाठी महाविकासआघाडी सरकारने मदत जाहीर केली. आता केवळ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणे बाकी आहे. मात्र, अजूनही केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात आलेलेच नाही. यावर आता भाजप नेते का गप्प आहेत, असा सवाल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केला. (Congress leader Vijay Wadettiwar slams BJP over Farmers aid)
राज्यात कोरोना प्रादुर्भावाचा धोका कायम असल्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठी वेळ लागत आहे. आता पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यात अडचण येत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची सर्व तयारी झाली आहे. त्यामुळे आता मी निवडणूक अधिकाऱ्यांकडे या मदतीचे वाटप करण्याची परवानगी मागणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
तसेच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले भाजप नेते केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भात शांत का आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला. महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आज 18 दिवस उलटूनही केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यात फिरकलेले नाही. विरोधक यावर चकार शब्दही बोलत नाहीत, नक्की काय गौडबंगाल आहे? कुठे गेले केंद्राचे पथक आणि कुठे गेले विरोधक?, असे वडेट्टीवार यांनी विचारले. तसेच या प्रश्नावर विरोधकांनी मोठा आवाज नको पण किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
यावेळी वडेट्टीवार यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन रान उठवणाऱ्या भाजपलाही लक्ष्य केले. मराठी माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर त्यांना सुरक्षा द्यायची नाही का? अर्णव गोस्वामी घटनेपेक्षा मोठे आहेत का? त्यांच्यावर झालेली कारवाई योग्य आहे. लोकांच्या भावना लक्षात घ्या, तुमचे कपडे उतरवले जात आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी भाजपवर केली.
संबंधित बातम्या:
पांढऱ्या सोन्याला लाल बोंड अळीचं ग्रहण, शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात
अकोल्यात शेतकरी पुत्रांचं शोले स्टाईल आंदोलन, पोलीस घटनास्थळी दाखल
ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?
(Congress leader Vijay Wadettiwar slams BJP over Farmers aid)