मुलं पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या नेत्यांचीच धुलाई

| Updated on: Jul 27, 2019 | 7:17 PM

मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या दोन नेत्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्याचीच धुलाई करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण आरोपींनी तोपर्यंत धूम ठोकली.

मुलं पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या नेत्यांचीच धुलाई
Follow us on

भोपाळ : मुलं पळवणारी टोळी समजून यापूर्वी जमावाने हिंसाचार केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण मध्य प्रदेशात यावेळी धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या दोन नेत्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्याचीच धुलाई करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण आरोपींनी तोपर्यंत धूम ठोकली.

‘एनबीटी’च्या वृत्तानुसार, बैतुल जिल्ह्यातील शाहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. काँग्रेस नेते धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधी ललित बारस्कर गुरुवारी रात्री केसिया गावातून त्यांच्या कारमधून परतत होते. यावेळी गावातील रस्त्यावर फांद्या पडलेल्या होत्या. या फांद्या पाहून तीनही नेते घाबरले आणि त्यांनी कार पुन्हा माघारी वळवली.

कार परत फिरत असल्याचं पाहून ग्रामस्थ आक्रमक झाले आणि कारवर धावून आले. ही मुलं पळवणारी टोळी असल्याचं गावकऱ्यांना शंका आली आणि त्यांना या तीनही नेत्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात कारचंही मोठं नुकसान करण्यात आलंय, शिवाय नेत्यांनाही दुखापत झाली आहे. पोलिसांनी या घटेनचा तपास सुरु केलाय.