दत्ता कनवटे, औरंगाबादः राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र वीर सावरकरांबाबतचं (Veer Savarkar) वक्तव्य त्यांनी महाराष्ट्रातच का केलं? कारण महाराष्ट्राची अस्मिता मी किती पायदळी तुडवू शकतो, हे त्यांना दाखवून द्यायचंय… असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही. खरं तर राहुल गांधींच्या या वक्तव्याचा खरा धोका त्यांच्यासोबत यात्रेत फिरणाऱ्या इथल्या काँग्रेस नेत्यांनाच आहे, असा इशाराही महाजन यांनी दिला.
राहुल गांधींची आज शेगाव येथे मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. या सभेत काळे झेंडे दाखवून मनसेतर्फे निषेध व्यक्त केला जाणार आहे. औरंगाबादहून प्रकाश महाजन, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई या नेत्यांसह असंख्य मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.
औरंगाबादमध्ये सकाळी मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी प्रकाश महाजन यांनी टीव्ही 9 शी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कुणी सावरकरांच्या वंशजांनी अडवलं का? तुम्ही सावरकरांबद्दल का बोलले?महाराष्ट्रातच येऊन का बोलले? महाराष्ट्रातील अस्मिता मी किती पायदळी तुडवतोय, हे दाखवून द्यायचंय… हे त्यांना दाखवायचंय. त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनाच हा धोका आहे, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिलाय.
राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणाले आहेत. त्यांनी तसे पुरावेही दिले. पण राहुल गांधींनी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केलाय.
प्रकाश महाजन म्हणाले, ‘ तो माफीवीर म्हणतोय, तर तुझ्या पणजोबांनीही अंडरटेकिंग दिलंय. याचा खापर पणजोबा आजारी असताना पंडित जवाहरलाल नेहरूंना पंजाबमधल्या नैनी जेलमधून सरकारला एक अंडरटेकिंग दिलंय. ते कशासाठी दिलं, हे दाखवावं, असं आवाहन प्रकाश महाजन यांनी केलं.
राहुल गांधी केवळ प्रसिद्धीसाठी हे करतात. महाराष्ट्रात येऊन आम्ही महाराष्ट्राचा कसा अपमान करू शकतो, हे दाखवण्यासाठी राहुल गांधींनी हा मुद्दा उकरून काढल्याचं प्रकाश महाजन म्हणाले.