नवी दिल्ली : मोदी लाट 2.0 मध्ये काँग्रेससह इतर पक्षांचाही सुपडासाफ झालाय. भाजपने स्वबळावर 300 चा, तर एनडीएने 350 आकडा गाठलाय. काँग्रेसला 2014 च्या निवडणुकीत 44 जागा मिळाल्या होत्या, ज्यामुळे विरोधी पक्ष नेता पदही मिळू शकलं नाही. या लोकसभेलाही तिच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे 50 पेक्षाही कमी खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसला विरोधी पक्ष नेता नसणे हे 2014 मध्ये पहिल्यांदाच घडलं होतं. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला हा दर्जा मिळण्यापासून वंचित रहावं लागू शकतं.
काँग्रेसला 50 पेक्षा कमी जागा मिळत असल्यामुळे विरोधी पक्ष नेता कोण होणार याकडे लक्ष लागलंय. नियमानुसार विरोधी पक्ष नेता हे पद मिळण्यासाठी 543 च्या 10 टक्के म्हणजे 55 जागांची आवश्यकता असते. एका पक्षाला एवढ्या जागा असतील तर संसदेत विरोधी पक्ष नेता पद दिलं जातं. पण इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसला या पदापासून वंचित रहावं लागलं होतं.
यावेळी राहुल गांधींकडेच पक्ष नेत्याची जबाबदारी?
लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी पार पाडण्याचं काम काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे होतं. पण यावेळी कर्नाटकातील गुलबर्गामधून खर्गेंचा पराभव झालाय. लोकसभेत येणारे काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार हे केरळ आणि पंजाबमधील असतील. त्यामुळे सक्षम हिंदी भाषिक नेता या पदासाठी निवडणं हे काँग्रेससमोर आव्हान असेल. अशा परिस्थितीत राहुल गांधींचंच नाव पुढे येऊ शकतं.
2014 मध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेता पद न मिळाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांची लोकसभेत गटनेता म्हणून निवड करण्यात आली. पाच वर्ष त्यांनी या पदावर काम केलं. अनेकदा विरोधी पक्ष नेता हे पद देण्यासाठी सरकारला विनंती केली, पण पद मिळालं नाही. यावेळी काँग्रेसला चांगल्या जागांची अपेक्षा होती. पण अर्थशतकही करता आलं नाही.