मुंबई : कोरोना संसर्गामुळे देशभरातील अनेक राजकीय नेत्यांना प्राण गमवावे लागले आहेत. काँग्रेस खासदार राजीव सातव यांचेही कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. कोरोनाने गांधी कुटुंबाचे दोन ‘आधारस्तंभ’ हिरावले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गेल्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचे निधन झाले होते, तर आज राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांची प्राणज्योत मालवली. सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू नेते होते, तर अहमद पटेल हे गांधी कुटुंबाचाच आधारस्तंभ होते. (Congress Looses two gems within year by Corona Congress MP Rajeev Satav and Ahmed Patel)
काँग्रेसचा ‘चाणक्य’ हरपला
काँग्रेसचं पहिल्या फळीतील मोठं नाव, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं 26 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झालं. अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते.
सत्ता उपभोगण्यापेक्षा पक्षसंघटनेवर भर
इंदिरा गांधींच्या काळात 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली होती. त्यावेळी काँग्रेसच्या मूठभर विजयी उमेदवारांमध्ये अहमद पटेल यांचं नाव होतं. पुढे 1980 मध्ये काँग्रेसनं दमदार पुनरागमन केलं. त्यावेळी इंदिरा गांधी अहमद पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्यास इच्छुक होत्या. पण पटेल यांनी आपण संघटना मजबूत करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत पक्षासाठी काम करणं पसंत केलं.
राजीव गांधी यांनीही 1984 च्या निवडणुकीनंतर पटेल यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. तेव्हाही पटेल यांनी ते विनम्रपणे नाकारत पक्षासाठी काम करण्यालाच पसंती दिली. राजीव गांधी यांच्या काळात अहमद पटेल यांनी काँग्रेसमध्ये युवकांचं संघटन बांधलं. त्याचा मोठा फायदा पुढे सोनिया गांधी यांना झाला.
अहमद पटेल यांना 10 जनपथचा चाणक्य म्हणून ओळखलं जायचं. ते गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि काँग्रेसमध्ये गांधी परिवारानंतर नंबर 2 चे नेते होते. काँग्रेस पक्षावर त्यांची पकड अतिशय मजबूत होती. राहुल गांधी यांनाही सातत्यानं अहमद पटेल यांचा सल्ला घ्यावा लागत होता. 2018 मध्ये अहमद पटेल यांनी गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवली. त्यांचा पराजय करण्यासाठी भाजपनं आपली सर्व ताकद पणाला लावली होती. तरीही अमहद पटेल यांनी 44 मतं घेत विजय मिळवला आणि भाजपचे उमेदवार बलवंत सिंह राजपूत यांना 38 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.
राजीव सातव यांचे निधन
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळला होता. दीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोण होते राजीव सातव?
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.
राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे. (Corona Congress Rajeev Satav Ahmed Patel)
चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राज्यसभेवर वर्णी
राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.
“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी अपरिमित नुकसान आहे” अशी भावूक प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली.
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
संबंधित बातम्या :
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी
अहमद पटेल यांचं दु:खद निधन, गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास
(Congress Looses two gems within year by Corona Congress MP Rajeev Satav and Ahmed Patel)