चंद्रपूर : विधानसभेच्या तोंडावर भाजपची महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. सर्वच प्रमुख पक्ष जनतेमध्ये जात असताना यामध्ये काँग्रेस कुठेही दिसत नव्हती. काँग्रेसनेही अखेर महापर्दाफाश यात्रा (Congress Mahapardafash Yatra) सुरु केली. पण याला अंतर्गत कलहाचं ग्रहण लागलंय. या अंतर्गत कलहामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे होणारी महापर्दाफाश यात्रेतील (Congress Mahapardafash Yatra) सभा रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. यानंतर पक्षाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला.
चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी येथील होणारी काँग्रेसची महापर्दाफाश सभा अखेर रद्द झाली. या जागेतून राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आमदार आहेत. भाजप सरकारच्या विरोधात यात्रा काढताना भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार नाना पटोले यांना नेतृत्व आणि पक्षाकडून झुकतं माप दिल्याने वडेट्टीवार नाराज असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. यात्रा सुरू झाल्यावर देखील वडेट्टीवार यात फारसे झळकले नाहीत.
नाना पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यात सुप्त नेतृत्व संघर्ष सुरू आहे. या अंतर्गत संघर्षाचा परिणाम म्हणून ब्रह्मपुरी येथील महापर्दाफाश यात्रा सभाच रद्द झाली. यामुळे काँग्रेसचा अंतर्गत कलह उघड झाला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या संघर्षात विजय वडेट्टीवार यांचा विजय झाल्याचं समजलं जात असून ब्रह्मपुरी येथे होणारी रॅली रद्द झाल्याने कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश गेल्याचं म्हटलं जातंय.
विजय वडेट्टीवार यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार छाननी समितीत स्थान दिलं गेल्याने त्याच्या बैठकीच्या निमित्ताने ते दिल्लीत असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं आहे. दरम्यान चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी येथे रद्द झालेली काँग्रेसची सभा राज्य सरकारच्या विकासपूरक धोरणांना विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. तो देखील फसला असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
राज्यात यात्रांची यात्रा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष जनतेमध्ये मिसळण्यासाठी सरसावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सुरु आहे, तर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभर फिरत आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या यात्रांचं वारं आहे. पण यात मागे पडलेल्या काँग्रेसला आघाडी घेण्याची संधी असतानाही अंतर्गत कलहाचं ग्रहण लागल्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.