सत्तासंघर्षात ट्विस्ट, शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसकडून हिरवा कंदिल?

| Updated on: Nov 10, 2019 | 11:44 AM

जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्तासंघर्षात ट्विस्ट, शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसकडून हिरवा कंदिल?
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरु असतानाच एक मोठा राजकीय ट्विस्ट आलेला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने अखेर हिरवा कंदिल दाखवल्याची चर्चा आहे. जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा सूर निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सरकार स्थापन (Congress may Support Shivsena) करणार, की भाजपला पाठिंबा देऊन महायुतीचंच सरकार येणार, हा कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे.

फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरमध्ये सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. या ठिकाणी झालेल्या बैठकीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शवल्याची माहिती आहे. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने सकारात्मकता दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अशाप्रकारचा कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीही सुरुवातीला शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु नंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘सिल्व्हर ओक’मध्ये वाढलेल्या फेऱ्यांमुळे सेना-राष्ट्रवादी सूत जुळण्याची चिन्हं पुन्हा निर्माण झाली.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार हुसैन दलवाई यांनीही संजय राऊतांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर काँग्रेसमधील तरुण आमदारांनीही शिवसेनेला पाठिंबा देण्याची मागणी धरली होती. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र भाजपने असं आश्वासनच दिलं नसल्याचं म्हटल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन करण्याची संधी शिवसेनेला मिळाली, तर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार (Congress may Support Shivsena), याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या 99 टक्के आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा?

काँग्रेसने पाठिंबा दिल्यास…. (Congress may Support Shivsena)

शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162
बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168
बहुमताचा आकडा – 145

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार (08)

  1. आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
  2. नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
  3. चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)
  4. मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)
  5. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
  6. बच्चू कडू – <पक्ष – प्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)
  7. राजकुमार पटेल – <पक्ष – प्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)
  8. शंकरराव गडाख – <पक्ष – क्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)

सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली आहे. परंतु भाजपचे 105 आमदार निवडून आले असून अपक्षांच्या पाठिंब्यावर त्यांचं संख्याबळ 116 वर जातं. त्यामुळे 145 चा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी 29 आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले आमदार (11)

  1. महेश बालदी – उरण (रायगड)
  2. विनोद अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
  3. गीता जैन – मीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)
  4. किशोर जोरगेवार – चंद्रपूर (चंद्रपूर)
  5. रवी राणा – बडनेरा (अमरावती)
  6. राजेंद्र राऊत – बार्शी (सोलापूर)
  7. प्रकाश आवाडे – इचलकरंजी (कोल्हापूर) (काँग्रेस बंडखोर)
  8. संजय मामा शिंदे – करमाळा (सोलापूर) (राष्ट्रवादी बंडखोर)
  9. श्यामसुंदर शिंदे – <पक्ष – शेकाप> लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)
  10. रत्नाकर गुट्टे – <पक्ष – रासप> – गंगाखेड (परभणी)
  11. विनय कोरे – <पक्ष – जनसुराज्य पक्ष> – शाहूवाडी (कोल्हापूर)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
  • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
  • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
  • अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
  • एकूण – 288Congress may Support Shivsena