मुंबई : “खाटेचे कुरकुरणे समजून घ्या” अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘सामना’च्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे. ‘सामना’चा अग्रलेख हा अपूर्ण माहितीवर आधारित असून आम्ही म्हणणे मांडल्यावर त्यांनी पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा, अशी मागणी थोरात यांनी केली. (Balasaheb Thorat answers Saamana Editorial)
संख्याबळानुसार मंत्रिमंडळ वाटप झाले, त्यात वाद नाही, मात्र राज्याच्या मुद्यांवर आम्हाला भेटायचे आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमचं म्हणणं समजून घ्यावं, असं थोरात म्हणाले.
‘सामना’चा अग्रलेख हा अपूर्ण माहितीवर आधारित आहे. ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र असल्याने त्यांनी नीट माहिती घेऊन लिहावे, हे अपेक्षित आहे. कोणत्याही बदल्यांची आमची मागणी नाही. ‘खाटेचे’ कुरकुरणे ऐकून घ्यावे. आम्ही म्हणणे मांडल्यावर ‘सामना’त पुन्हा एकदा अग्रलेख लिहिला जावा. कारण यातून चुकीचा मेसेज जात आहे, असं थोरात यांनी सांगितलं.
हेही वाचा : खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, ‘सामना’तून काँग्रेसला चिमटे
“56-54-44 याप्रमाणे मंत्रिमंडळ वाटप झालं आहे. हा काही वादाचा विषय नाही. मात्र राज्याच्या हितासाठी काही मुद्दे मांडायचे आहेत. आम्ही भक्कमपणे महाविकास आघाडीत आहोत. परंतु व्यथा असली तर सांगितली पाहिजे” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नाहीत, हे चुकीचं आहे. एक दोन दिवसात भेटीची वेळ मिळेल. आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचं आहे. आमचे प्रश्न हे जनतेशी निगडित आहेत, अशी माहिती थोरात यांनी दिली.
पहा व्हिडिओ :
“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर भाष्य करण्यात आले आहे, तर भाजपला अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे.
“काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे” असेही अग्रलेखात म्हटले आहे. (Balasaheb Thorat answers Saamana Editorial)
हेही वाचा : आधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणे तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू’ असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली आणि तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की ‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये आमचेही ऐका’ असे अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा : ‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त
“चव्हाण-थोरातांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायलाच हवे. कारण सरकारचा तिसरा पाय काँग्रेसचा आहे. राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद जागांच्या समान वाटपाचा मुद्दा आहे. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 44. शिवसेना 56 आणि इतर जोडीदार पकडून 64, तर राष्ट्रवादीचे 54. त्यामुळे या प्रमाणात वाटप व्हायला हरकत नाही.” असे म्हटले आहे.
“बदल्या, बढत्या, आम्हाला हाच सचिव पाहिजे, हा सरकारमधला निरंतर चालणारा डाव आहे. त्यामुळे सरकारला धोका होईल आणि राजभवनाचे दरवाजे कुणासाठी पहाटे पुन्हा उघडले जातील या भ्रमात कोणी राहू नये” असा अप्रत्यक्ष इशारा भाजपला देण्यात आला आहे.
LIVETV – सामनामध्ये अपुऱ्या माहितीवरुन अग्रलेख लिहिला आहे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा अग्रलेख लिहिला जावा –
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात https://t.co/ImprYhMJl7 @bb_thorat pic.twitter.com/XCaK37mkaY— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2020