Congress MLA meet CM Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. सध्या अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर आता हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम करणार असल्याचे बोललं जात आहे.
“शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आता हिरामण खोसकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली”, असे हिरामण खोसकर यांनी म्हटले.
“मी माझ्या मतदारसंघातील एका महत्त्वाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. याच कॉमसाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मला मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठीची वेळ दिली होती. त्यामुळे मी भेट घेतली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही”, अशी प्रतिक्रिया जितेश अंतापूरकर यांनी केले.
दरम्यान काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे दोन्हीही नेते काँग्रेस हायकमांडच्या रडारवर आहेत. या दोन्हीही नेत्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या कारवाईपूर्वीच या दोन आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश घेणार असल्याचे बोललं जात आहे.