सातारा : माढा लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विशेष म्हणजे भाजपला राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांकडूनच मदत होत आहे. अगोदर मोहिते पाटील कुटुंब, नंतर निंबाळकर कुटुंब, काँग्रेसचे कल्याण काळे आणि आता गोरे बंधूंनीही भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांनी पक्षाला रामराम करत माढा लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच मदत करणार असल्याचा ठाम निर्धार केलाय.
वाचा – सोलापूर, माढ्यात भाजपची ताकद आणखी वाढली, काँग्रेस नेत्याचा भाजपप्रवेश
जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत. गोरे बंधूंच्या या निर्णयामुळे आघाडीचे सर्व समीकरणे बिघडली आहेत. यावेळी आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी महायुतीला पाठिंबा असल्याचं हात वर करुन सांगितलं. यावेळी गोरे म्हणाले, “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल.”
वाचा – ‘शिंदे घराणं संपवण्यासाठी पवारांकडून संजय शिंदेंना उमेदवारी’
गोरे बंधू यांच्यातला वाद जरी टोकाचा असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला दोन्ही भावांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा माढ्यातील सत्तेचा तिढा आता आणखी वाढलाय. यामुळे राष्ट्रवादीला साताऱ्यामध्ये चांगलाच फटका बसला आहे. या दोघांच्या बंडामुळे आता माण तालुक्याची विधानसभा निवडणुकीची गणितं बदल्याचं राजकीय गोटात बोललं जातंय. परंतु या निर्णयामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, शरद पवारांनीही माढ्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा व विद्यमान आमदार
करमाळा (सोलापूर) – नारायण पाटील (शिवसेना)
माढा (सोलापूर) – बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)
माळशिरस (सोलापूर) – हनुमंत डोळस (राष्ट्रवादी)
सांगोला (सोलापूर) – गणपतराव देशमुख (शेकाप)
माण (सातारा) – जयकुमार गोरे (काँग्रेस)
फलटण (सातारा) – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
माढ्यासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. माढ्यासह जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले अशा एकूण 14 जागांसाठी मतदान होणार आहे.