मतदारांना मेकअप किट वाटल्याने गुन्हा, प्रणिती शिंदे अडचणीत

| Updated on: Sep 25, 2019 | 7:05 PM

मतदारांना मेकअप किट (Praniti Shinde Make up box) वाटल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. पोलिसांपर्यंत हा वाद गेल्यानंतर पडताळणी केल्यानंतर अखेर प्रणिती शिंदेंविरोधात गुन्हा दाखल झालाय.

मतदारांना मेकअप किट वाटल्याने गुन्हा, प्रणिती शिंदे अडचणीत
Follow us on

सोलापूर : अद्याप उमेदवार जाहीर झालेले नसतानाही सोलापुरात काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झालाय. एकीकडे नेत्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय, तर दुसरीकडे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde Make up box) या अडचणीत आल्या आहेत. मतदारांना मेकअप किट (Praniti Shinde Make up box) वाटल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. पोलिसांपर्यंत हा वाद गेल्यानंतर पडताळणी केल्यानंतर अखेर प्रणिती शिंदेंविरोधात गुन्हा दाखल झालाय.

प्रणिती शिंदेंकडून मेकअप बॉक्स वाटले जात असल्याचं लक्षात आलं आणि राजकीय विरोधक नरसय्या आडम यांना आयता मुद्दा मिळाला. आचारसंहिता लागू झालेली असतानाही मतदारांना आकर्षिक करण्यासाठी मेकअप बॉक्स वाटले जात असल्याची तक्रार आडम मास्तरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत तथ्य आढळल्याने व्यंकटेश्वरनगर परिसरात ‘शहर मध्य’च्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या दोन महिला कार्यकर्त्यांविरुद्ध मेकअप वाटून आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख ईश्वर गिडवीर यांच्या फिर्यादीनुसार सोलापुरातील जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे मेकअप किट प्रकरण?

प्रणिती शिंदेंनी दोन वेळा आडम मास्तरांना पराभूत केल्यामुळे ते नैराश्येतून आरोप करत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. प्रणिती शिंदे यांच्याकडून आचारसंहितेच्या आधी, म्हणजे गौरी-गणपतीच्या काळात भेटवस्तू देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या मुद्द्याला घेऊन अशा प्रकारे राजकीय भांडवल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

कोण खोटं आणि कोण खरं हे आता पोलिसांच्या चौकशीवर आणि तपासावर अवलंबून आहे. पण काही खरं असलं सध्या तरी मेकअप बॉक्समुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आडम मास्तरांच्या हातीही आयतं कोलीत मिळालंय.