चंद्रपूर : महाविकास आघाडीतील कुरबुऱ्या काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी ठाकरे सरकारची डोकेदुखी ठरत आहे. आता काँग्रेस आमदाराने थेट आमचा मान राखला जात नाही, शिवाय काँग्रेस आमदारांची कामं होत नाहीत, असा आरोप केला आहे. (Congress MLA’s complaint against Eknath Shinde)
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची कामं होत नाहीत. तसंच मान राखला जात नसल्याची तक्रार आमदार सुभाष धोटे यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान आमदार महोदयांनी ही तक्रार केली आहे. काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील तर लोकांना काय तोंड देणार असाही प्रश्न आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आमदार धोटे यांची मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तीव्र नाराजी दिसली.
एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून काम रोखल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. जर आमदारांचा मान राखला जात नसेल, काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील, तर लोकांमध्ये कसं जाणार असा सवाल धोटे यांनी विचारला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावे अशी विनंती यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी केली.
महाविकास आघाडीतील कुरबूर
यापूर्वी महाविकास आघाडीतील अनेक कुरबुऱ्या समोर आल्या होत्या. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पारनेर नगरसेवकांची फोडाफोडी, निर्णय प्रक्रियेत समाविष्ट न केल्याचा आरोप, महाजॉब्स पोर्टल जाहिरात, अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती अशा विविध विषयांवरुन महाविकास आघाडीत कुरबूर झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
(Congress MLA’s complaint against Eknath Shinde)
संबंधित बातम्या
महाविकास आघाडीत कुरबूर, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही!
.. तर सरकार आणि व्यक्तीश: मुख्यमंत्र्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते : शरद पवार