मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabaht Lodha) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भाजपाच्या वतीने मलीन केली जात आहे. पण त्याने काहीही फरक पडणार नाही, उलट त्यांचं तेज अजून वाढत आहे. त्यांनी कितीही अवमान केला तरीही शिवरायांचा विचार संपणार नाही. माझं आवाहन आहे की महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आमदार जे आहेत. त्यांनी महाराजांचा स्वाभिमान असेल तर त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत”, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अरबी समुद्रात बनवण्याचा दिखावा यांनी केला. तर दुसरीकडे सतत त्यांचा अवमान करायचा अधिकार त्यांना कोणी दिला? असली इंग्रज पद्धत आता महाराष्ट्र सहन करणार नाही. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आता माफी नाही. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. कारण मोठ्या भीतीने ते मुख्यमंत्री झाले आहेत. एकीकडे महाराजांच्या नावाचा गवागवा करायचा आणि दुसरी कडे अपमान करायचा हे भाजप करत आहेत. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
काल शिवप्रतापदिनी प्रतापगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्याहून सुटकेशी केली. औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे.
शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. त्यामुळे अशी वादग्रस्त विधानं करणाऱ्या आमदारांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे.