मुंबई : शिवसेनेला पाठिंबा पत्र देण्यावरुन झालेल्या गोंधळाला आता काँग्रेस-राष्ट्रवादी (congress NCP blame game) एकमेकांना जबाबदार धरत आहेत. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीमुळे (congress NCP blame game) पत्र देण्यास विलंब झाल्याचं म्हटलं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचं पत्र न आल्यामुळे राष्ट्रवादीने पत्र दिलं नाही असं म्हटलं. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 20 वा दिवस उलटला तरी सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम आहे. या सत्तासंघर्षात काल (11 नोव्हेंबर) 19 व्या दिवशी नाट्यमय घडामोडी झाल्याचे पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहाय्याने शिवसेना महासेनाआघाडी सरकार स्थापन करणार असं वाटत असतानाच शिवसेनेचा भ्रमनिराश झाला. शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केला खरा, पण दोन्ही काँग्रेसचं पाठींब्याचं पत्रच न मिळाल्यानं शिवसेनेची दोन्ही काँग्रेसनं गोची केल्याचं पाहायला मिळालं.
माणिकराव ठाकरे काय म्हणाले?
शरद पवार यांनी चर्चेसाठी आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना (Sharad Pawar stopped Congress from Supporting) केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली गेली. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला या संदर्भात माहिती दिली. त्यामुळे चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात आला आहे.
‘आम्ही तयारीत होतो, पण पवारांनी सूचित केल्यामुळे अंतिम निर्णय घेतला नाही. पवारांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आज मुंबईला जाणार होते. परंतु आजच्या ऐवजी परवा भेटू, असं नंतर पवारांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील नेते आज शरद पवारांची भेट घेणार नाहीत’, असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार काय म्हणाले?
“आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळं सगळ्या गोष्टी एकत्र ठरणार आहेत. तुम्ही जसं म्हणता तसं काही नाही. सकाळी 10 ते रात्री 7.30 वाजेपर्यंत आमचे सगळे नेते काँग्रेसच्या पत्राची वाट पहात होतो. संध्याकाळी 7.30 पर्यंत काँग्रेसचं लेटर आलं नाही त्यामुळं आम्ही लेटर थांबवलं. फक्त आम्ही पत्र देऊन काही उपयोग नव्हता. म्हणून आम्ही एकट्याने पत्र दिलं नाही. आम्ही काँग्रेसशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेता येत नाही.
अहमद पटेलांशी शरद पवारांची चर्चा झाली. दिल्लीत येऊ शकत नाही कारण आज आमच्या आमदारांची बैठक आहे. बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार यांना रात्री उशिरापर्यंत मुंबईत या असं म्हंटल होतं. पण ते काही मुंबईत आले नाहीत. आज कुठल्याही परिस्थीतीत ते मुंबईत आलेच पाहिजेत. आज 2 वाजता जी बैठक आहे त्यानंतर आमचा निर्णय होईल. सरकारला स्थिरता हवी असेल तर तीनही पक्षांनी आतून एकत्र यायला हवं. काँग्रेसचे आमदार जयपूरला असल्यामुळं चर्चा व्हायला काही वेळ लागला, अडचणी आल्या”, असं अजित पवार म्हणाले.
शिवसेनेला मुदतवाढ नाही
दरम्यान, शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी मुदतवाढ दिलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं देण्यात आल्याचीही माहिती पुढे आली. त्यामुळे महाराष्ट्रात आता महासेनाआघाडीचं सरकार येणं जवळपास निश्चित मानलं जात होतं. इतकंच काय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली गेली. परंतु काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे या चर्चेतील हवा निघाली.