काँग्रेस-राष्ट्रवादीचा पुन्हा समन्वय, रद्द बैठक पुन्हा सुरु

| Updated on: Nov 13, 2019 | 9:16 PM

काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक (Congress NCP coordination committee meeting) अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा पुन्हा समन्वय, रद्द बैठक पुन्हा सुरु
Follow us on

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक (Congress NCP coordination committee meeting) अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक (Congress NCP coordination committee meeting) आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.


सुरुवातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी बैठक रद्द झाल्याचं म्हणत मी बारामतीला जात असल्याचं म्हटलं. तसेच याविषयी मला अधिक काही माहिती नाही म्हणत त्यांनी बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देखील हजर होते, मात्र त्यांनी देखील अजित पवारांच्या या वक्तव्यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सुरुवातीला ही बैठक काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

ही बैठक रद्द का झाली याबाबतची मला माहिती नाही. मी बारामतीला जात आहे. नो कमेंट, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती.

किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत पहिलीच भेट होणार होती. मात्र, तीच रद्द झाल्याचं बोललं गेल्याने चर्चेला उधाण आले होते. बैठक ऐनवेळी रद्द करण्यामागील नेमकं कारणही सांगण्यात न आल्याने गोंधळात आणखी भर पडली. मात्र, या गोंधळानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले. त्यानुसार ही बैठक होत असून दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीतील नेते चर्चा करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

हे खरं आहे की आजची बैठक रद्द झाली. मात्र, ते बैठकीचा पुन्हा वेळ ठरवून कळवतील. काही कारणाने बैठक रद्द झाली असेल, तर याला आघाडीत काही असंतोष आहे असं बोलू नये अशी विनंती, तर्कवितर्क लढवू नये, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

बैठक रद्द होण्यात आणि ती बैठक दुसऱ्या दिवसावर जाण्यात काहीही विशेष नाही. याला महत्त्व देऊ नये. आधी निरोप आला होता की आज सायंकाळी 7.30 वाजता बैठक होती. अजित पवार यांना बारामतीला जायचं होतं म्हणून बैठक रद्द झाली. उद्या सायंकाळी बैठक होईल, असं थोरात यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

राजकारणात काही गोष्टी गुपीत ठेवायच्या असतात. त्यामुळे सर्व काही तुम्हाला सांगता येणार नाही. अजित पवारांचा स्वभाव, बोलणं गावरान असून ते गमतीने बारामतीला जात असून बैठक रद्द असं म्हटले. बैठक सुरु आहे. अजित पवार नेत्यांशी बसून बोलत आहेत. सर्व व्यवस्थित आहे. आमच्या बैठका कोठे सुरू आहे हे सर्व तुम्हाला सांगता येणार नाही. अजित पवार मस्करीत बोलून निघून जातात. त्यामुळे ते असं काही बोलले असतील. इतके कॅमेरे असल्याने आम्हालाही भीती वाटते. सगळे कार्यक्रम रद्द करुन राज्यासाठी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठक सुरु आहे. त्यात निर्णय होईल,

अशोक चव्हाण –
बैठक रद्द झाल्याची अधिकृत माहिती मला मिळालेली नाही. त्यामुळे मी दुजोरा देऊ शकत नाही. काँग्रेसची अंतर्गत चर्चा होती, ती प्राथमिक चर्चा झाली. बैठकीबाबत काही माहिती आल्यास ती देईन, असं अशोक चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादीकडून अद्याप बैठकीचा निरोप नाही. काँग्रेसची प्राथमिक चर्चा झाली. राष्ट्रवादीकडून चर्चेचा निरोप आला तर जाऊ. आमच्यात कुठलाही वाद नाही. बैठक व्हावी अशी चर्चा होत होती, पण त्याबाबत त्यांच्याकडून सध्या कुठलाही निरोप नाही. दोन्ही पक्षात चांगला समन्वय आहे. शिवसेनेशी चर्चा करण्याचा प्रयत्न आहे,  ते काय असेल ते कळवतील, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

सुनिल तटकरे –

मी दिल्लीत सोमवारपासून जे अधिवेशन होणार आहे तेथे कोणती भूमिका घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. मी बैठकीत शेवटी सहभागी झालो. त्यामुळे मला काही कल्पना नाही. प्रादेशिक पातळीवरील बैठका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि इतर नेते यांच्यात होणार असेल तर याची मला कल्पना नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

बैठकीपूर्वी जयंत पाटील काय म्हणाले होते?

आता संध्याकाळी 7:30 वा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मिटिंग आहे, त्याची चर्चा करण्यासाठी आलो आहे. आमची मिटिंग झाली की सेनेसोबत चर्चा केली. आरएसएससोबत भाजप चर्चा करत असली तरी सेनेनं आम्हला एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे,  यामुळे तसं काही होणार नाही. तीन पक्ष एकत्र येणार आहेत. त्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम करत आहोत.