बारामती : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम करतात. मात्र प्रत्येकवेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दगाबाजी केली जाते. त्यामुळेच आता राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत असताना लोकसभा निवडणुकांपूर्वी इंदापूरची जागा कोणाला देणार हे जाहीर करावं, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीत काम करणार नाही, अशी भूमिका इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी समविचारी पक्षांची जुळवाजुळव करत असतानाच इंदापूरच्या जागेवरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही याच जाहीर कार्यक्रमात इंदापूर आणि पुरंदरच्या जागेचा निर्णय लोकसभेपूर्वी जाहीर करण्याची मागणी केली.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी इंदापूर तालुक्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात हे अनेकदा पाहायला मिळालंय. भाजप सरकारबद्दलची नाराजी लक्षात घेता आता राष्ट्रीय पातळीवरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. असं असलं तरी इंदापूरच्या जागेवरून मात्र वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचं भूमीपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत पार पडलं. या कार्यक्रमात नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभेची जागा कोणाला द्यायची याचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम करणार नाही हीच कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं जाहीर केलं. काँग्रेसचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं प्रामाणिकपणे काम करतात, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच दगाफटका होत असल्याने इंदापूरची जागा कोणाला हे जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्ते आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम प्रामाणिकपणे करतात. मात्र तरीही राष्ट्रवादीकडून सतत काँग्रेसची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असल्याने इंदापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच भाषणाचा धागा पकडत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही इंदापूरबरोबरच पुरंदरच्या जागेबद्दलही भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी केली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातलं विळ्याभोपळ्याचं नातं सर्वश्रूत आहे. त्यामुळेच अनेकदा हर्षवर्धन पाटील यांचा पाडाव करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झालाय. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी तुटली तरी इंदापूरची जागा काँग्रेसला सोडणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर अनेकदा या विषयावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस झाल्याचं पाहायला मिळालंय. आज तर थेट काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांसमोरच लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभेची जागा कोणाला देणार हे जाहीर झाल्याशिवाय लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार नाही असा पवित्रा घेतलाय.