मुंबई : “ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही” असं म्हणत “ही राजकारणाची वेळ नाही” असा टोला लगावणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसने उत्तर दिलं आहे. (Congress Raju Waghmare Answers Sharad Pawar taunt over Politics on India China conflict)
“ज्या काँग्रेस पक्षाने 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये घालवला, ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध झाली, युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करतो, त्याचा प्रश्नच येत नाही” असं काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले.
“आमचे नेते राहुल गांधी तेच म्हणत आहेत, चीनने घुसखोरी केली की नाही ते सांगा, आमचे 20 जवान कसे शहीद झाले ते सांगा, कारण गृहमंत्री सांगत आहेत घुसखोरी झाली, चार दिवसानंतर पंतप्रधान सांगतात घुसखोरी झालेली नाही. तोच प्रश्न आम्ही विचारत आहोत.” असं वाघमारे म्हणाले.
“शरद पवार म्हणाले 1962 च्या युद्धामध्ये आपली काही जमीन त्यावेळी चीनने घेतली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या गोष्टी संसदेसमोर मांडल्या. आम्हीही तेच म्हणतोय तुम्ही या गोष्टी देशासमोर मांडा.” असं म्हणत “सैन्याच्या बाबतीत राजकारण करणे हा भाजपचा धर्म आहे.” असा आरोप वाघमारेंनी केला.
हेही वाचा : 1962 मध्येही भारताचा भूभाग गेला, ही राजकारणाची वेळ नाही, पवारांचा काँग्रेसला टोला?
“पुलवामानंतर कोणी राजकारण केलं असेल आणि सैन्याला पुढे करुन कोणी मतं मागितली असतील तर ती भाजपने. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण ना कधी काँग्रेसने केले, ना आता करतंय.” असा दावाही राजू वाघमारे यांनी केला.
चीन घुसखोरी व 20 जवान शहीद या प्रश्नाचे काँग्रेस राजकारण करत आहे का? याचे अचूक उत्तर व यावर खरे कोण व का राजकारण करीत आहे? ते पहा व शेअर करा @INCMaharashtra @INCMumbai @BJP4Maharashtra @bb_thorat @AshokChavanINC @TV9Marathi @SATAVRAJEEV @ANI @SakalMediaNews @abpmajhatv @MiLOKMAT pic.twitter.com/9oCfgWcQsC
— Dr. Raju waghmare (@drrajuwaghmare) June 28, 2020
भारत-चीन सीमावाद सुरु असताना काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत-चीन सीमावादावरुन केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर शरद पवार यांनी ही राजकारणाची वेळ नाही म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.
“चीन कुरापत नक्कीच करत आहेत. आपण आपला रस्ता आपल्या हद्दीत करत आहोत. आपण आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. सियाचीन भागासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. 1993 साली मी संरक्षण मंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी करार केला”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
“सीमा भागात गस्त घालताना काहीही होऊ शकतं. त्यामुळे लगेच संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे, असं म्हणू नये”, असंही पवारांनी म्हटलं. “चीनने यापूर्वीच 1962 साली भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही, हे माहीत नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. (Congress Raju Waghmare Answers Sharad Pawar taunt over Politics on India China conflict)