काँग्रेसने पैसे नसल्याने गरीब कार्यकर्त्याचा अर्ज नाकारला

| Updated on: Jul 06, 2019 | 7:59 PM

पैसे नसल्यामुळे काँग्रेसने इच्छुक तरुणाचा उमेदवारी अर्ज नाकारल्याचा प्रकार औरंगाबाद शहरात घडला. विशाल लांडगे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांचे फॉर्म भरुन घेतले जात आहेत. यासाठी आज शेवटची तारीख होती.

काँग्रेसने पैसे नसल्याने गरीब कार्यकर्त्याचा अर्ज नाकारला
Follow us on

औरंगाबाद : प्रत्येक पक्ष निवडणुकांच्या काळात कार्यकर्त्यांना तुम्हीच आमची ताकद आहात, असं सांगतो. पण या कार्यकर्त्यांसाठी पक्षाला काही करण्याची वेळ येते तेव्हा काय होतं, याचं उदाहरण औरंगाबादमध्ये पाहायला मिळालं. पैसे नसल्यामुळे काँग्रेसने इच्छुक तरुणाचा उमेदवारी अर्ज नाकारल्याचा प्रकार औरंगाबाद शहरात घडला. विशाल लांडगे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांचे फॉर्म भरुन घेतले जात आहेत. यासाठी आज शेवटची तारीख होती. पण काँग्रेसचा इच्छुक विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 15 हजार रुपयांच्या डिमांड ड्रफ्टची अट आहे. विशाल लांडगे हा इच्छुक 15 हजाराचा डीडी देऊ न शकल्यामुळे अर्ज नाकारण्यात आला. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून तो विधानसभेसाठी इच्छुक होता.

अर्ज नाकारल्यानंतर या तरुणाला अपमानितही करण्यात आल्याची माहिती आहे. तुझ्याकडे पैसे नाहीत, तर मग कशाला भरतो अर्ज, असा सवाल काँग्रेस कमिटीने या कार्यकर्त्याला केला. औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला थेट चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यानंतर आता लोकसभेची तयारी सुरु करण्यात आली आहे. पण पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला साधा इच्छुकांचा फॉर्मही न भरु दिल्यामुळे कुजबुज रंगली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज भरण्यात आले आहेत. राष्ट्रवादीकडून यावेळी पवार कुटुंबातील तिसरी पिढी रोहित पवारांनीही इच्छुक म्हणून अर्ज भरलाय. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाची त्यांनी निवड केली आहे. पक्षाकडून इच्छुकांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय घेतला जाईल.