नवी दिल्ली: अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांच्या गाडीत 1 कोटी 80 लाखाची रोकड सापडली, असा दावा काँग्रेसने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी खांडूंच्या गाडीत रोकड सापडल्याने पंतप्रधानांवरही कारवाई हवी, अशी मागणी काँग्रेसने केली.
अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील गाडीत रोख रक्कम मिळाल्याचा दावा करत, काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ जारी केला. त्यामुळे चौकादारीची चोरी रंगेहात पकडली आहे, असा घणाघात सुरजेवाला यांनी केला.
“पेमा खांडू यांच्या ताफ्यातील गाडीतून रात्री 12 च्या सुमारास ही रोकड जप्त करण्यात आली. सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्यामुळे या घटनांचा निश्चितच एकमेकांशी संबंध आहे. भाजपने कॅश फॉर वोट घोटाळा केला आहे. पैसे घ्या, मत द्या ही पंतप्रधान मोदींची घोषणा आहे”, असं सुरजेवाला म्हणाले.
सुरजेवाला यांनी निवडणुकीत पैसे बाळगण्याबाबतचा नियम सांगितला. आरपीए 1951 नुसार, जर कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडे 50 हजार किंवा 1 लाखापेक्षा अधिक रोकड सापडल्यास आणि त्याच्याकडे त्या रकमेबाबत वैध कारण नसल्यास, तो पक्ष दोषी मानला जातो. लाचखोरीसाठी हा पैसा असल्याचं मानलं जातं, असं सुरजेवाला म्हणाले.