Pratap Sarnaik : आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं, ED च्या छापेमारीवर काँग्रेसची प्रतिक्रिया

| Updated on: Nov 24, 2020 | 11:09 AM

गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Pratap Sarnaik : आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं, ED च्या छापेमारीवर काँग्रेसची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. (Congress Sachin Sawant on ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

“विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

” भाजप हीन पातळीचं राजकारण करणारा पक्ष आहे. लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेष बुद्धीने  छापे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. गेल्या 6 वर्षात एकाही भाजप नेत्यावर ईडीने छापा का टाकला नाही? त्यांना का नोटीस नाही?”, असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले.

“सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपमध्ये प्रवेश दिले”, अशी टीका सावंत यांनी केली.

“भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्यांचा डोळा सत्तेकडे लागला आहे. या सगळ्या धाडी आणि छापेमारी सगळं चाललं आहे ते सत्तेसाठी आहे. देशात सर्वत्र अशा धाडी टाकल्या, तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरत आहे”, असं सचिन सावंत म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसच्या आरोपांचं भाजपने खंडन केलं आहे. “प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्याची माहिती ईडीचे प्रवक्ते देतील.. काँग्रेसच्या काळात सीबीआय पोपट होता. कायद्याला धाब्यावर बसवून काँग्रेसने काम केलं. भाजपच्या काळात यंत्रणेला स्वातंत्र्य आहे. नियमाप्रमाणे संस्था काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही धास्ती वाटणं साहजिक आहे”, असं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला दिलं.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपनं समर्थन केलं आहे.

सरनाईक कुटुंबियांच्या व्यवसायाशी तसेच इतर व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीकडून तपासण्यात येत आहे. त्याशिवाय गेल्या 4 वर्षात केलेले व्यवहार ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(Congress Sachin Sawant on ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

संबंधित बातम्या

MLA Pratap Sarnaik ED Raid Live | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन