मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या चार दिवसात कोसळल्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार निश्चित झालं (Congress-Shiv Sena-NCP Meeting) आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) शपथ घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतंच महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार (Congress-Shiv Sena-NCP Meeting) पडली. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्रिपदाबाबत चर्चा झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासोबतच प्रत्येक पक्षाचे एक किंवा दोन मंत्री शपथ घेतील. अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
“महाविकासआघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपदावरुन कोणतेही दुमत नाही. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे दिले जाणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रिपदही राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहे.” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
महाविकासआघाडी बैठक जवळपास संध्याकाळी 5 वाजता सुरुवात झाली. त्यानंतर 8.30 च्या सुमारास ही बैठक संपली. या बैठकीत काही खात्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून दावा केला गेला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीत खातेवाटपाबाबतचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. दरम्यान बैठकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे उद्या महाविकासआघाडीची पुन्हा बैठक होणार (Congress-Shiv Sena-NCP Meeting) आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समोर येत आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान उद्या उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे नेते शपथ घेण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकासआघाडीच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
महाविकासाआघाडीकडून शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं मिळणार आहे. महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असल्याचे निश्चित झालं आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून कालपर्यंत जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजित पवार यांच्या घरवापसीनंतर त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात (Ajit pawar will be deputy cm) रंगली आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून नेमकं कोण उपमुख्यमंत्री होणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
मंत्रिमंडळाचं संभाव्य वाटप
शिवसेना –
11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री + 1 मुख्यमंत्री – एकूण 16
राष्ट्रवादी –
11 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 4 राज्यमंत्री – एकूण 15
काँग्रेस –
9 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 3 राज्यमंत्री – एकूण 12 + विधानसभा अध्यक्षपद
शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य दावेदार
शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रिपदी वर्णी लागू शकते. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय उदय सामंत यांना गृहनिर्माण मंत्रिमंडळाचा कारभार कारभार दिला जाण्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेसमधून संभाव्य नावं कोणाची?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. तर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याचे संकेत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी या काँग्रेस आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.