पणजी : काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने त्याबाबतचं पत्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलं. भाजपने संख्याबळ गमावल्याने सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केलाय. पर्रिकर कॅन्सरशी लढत आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार केले जात असून ते मुख्यमंत्री म्हणून कामकाजही पाहत आहेत.
आमदार फ्रान्सिस डिसूझा यांच्या निधनाने भाजपकडे 13 आमदारांचं संख्याबळ उरलं आहे, मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. अशावेळी जे सरकार अल्पमतात आहे, त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करुन सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसने म्हटलं आहे.
Congress stakes claim to form government in Goa; writes to Governor to dismiss BJP-led govt which is in “minority” & call “single-largest party Congress to form govt”.Also states in its letter, “any attempt to bring Goa under President’s rule will be illegal & will be challenged” pic.twitter.com/EZ125NRO0a
— ANI (@ANI) March 16, 2019
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांचं नुकतंच निधन झालं होतं. 64 वर्षीय डिसूझा कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये गेले होते. त्यांनी 2002,2007,2012 आणि 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2012 मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.
दरम्यान, 40 सदस्यीय गोवा विधानसभेसाठी 2017 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेस 14 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 13 जागी विजय मिळाला. मात्र अन्य पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीला 3, गोवा फॉर्वर्ड पक्षाला 3 आणि अपक्ष 3 या सर्वांनी मिळून भाजपला पाठिंबा दिल्याने इथे युतीचं सरकार बनलं.
यापूर्वीही काँग्रेसची मागणी
दरम्यान, काँग्रेसने सर्वात मोठा पक्ष ठरल्याने सत्तास्थापनेचा दावा सर्वात आधी केला होता. मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. मग मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर गोवा,मुंबई आणि अमेरिकेत उपचार सुरु असल्याने, काँग्रेसने राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी विनंती केली होती.